‘प्रियोळच्या विकासासाठीच मी भाजपमध्ये’

कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला पक्षप्रवेश

पणजी :
माझ्या मतदारसंघाच्या भवितव्याच्या संपूर्ण विचार करत, आगामी काळामध्ये प्रियोळचा अजून विकास व्हावा या हेतूनेच मी आज अपक्ष आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतो आहे, असे सांगत राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज भाजपमधील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. जीसीसीआयमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.

गेल्या पाच वर्षांपासून मी भाजप सरकारमध्ये चार खात्यांचा मंत्री आहे. पहिल्यांदाच आणि तेही अपक्ष आमदार झाल्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि त्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मंत्रिपदे दिली. आणि माझ्या मतदारसंघामध्ये या सगळ्या कालखंडामध्ये मोठ्याप्रमाणात विकासकामे झाली आहेत. असे असले तरी येणार्‍या कामात उर्वरित कामांना गती मिळावी आणि दुर्गम मानल्या जाणार्‍या प्रियोळ मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा यासाठी येणारी निवडणूक भाजपच्यावतीने पक्षचिन्हावर लढवणार असल्याचे गोविंद गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेले काही महिने गोविंद गावडे हे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार? याबद्दल राज्यामध्ये चर्वितचर्वण सुरू होते. भाजपच्यावतीनेदेखील त्यांना खुले आवतण देण्यात आले होते. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपप्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गोविंद गावडे यांचे भाजपमध्ये स्वागत असून, त्यांना प्रियोळची उमेदवारी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. 2 जानेवारी रोजी गोविंद गावडे यांनी म्हार्दोळ येथे आयोजित आशीर्वाद यात्रा आणि त्यानंतरच्या प्रचार शुभारंभाच्या सभेमध्येही भाजपने आपल्याला गेल्या पाच वर्षांमध्ये खूप सहकार्य केले असून, आपण भाजपचा विश्वासघात करणार नाही असा शब्द दिला होता. कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करूनच आपण योग्य तो निर्णय घेऊ असेही त्यांनी त्यावेळी नमूद केले होते.

1 thought on “‘प्रियोळच्या विकासासाठीच मी भाजपमध्ये’”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *